करमाळा : तालुक्यातील अनेक गावातील पाणीपुरवठा योजना बंद होण्याच्या मार्गावर येत असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठा गंभीर होत चालला आहे. याबाबत प्रशासन लोकसभा निवडणुकीत व्यस्त आणि नागरिक पाण्यासाठी त्रस्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शासन पातळीवर पाणी प्रश्नावर अनेक योजना अमलात आणत आहे. सध्या महाराष्ट्र शासनाने जलजीवन मिशन अंतर्गत मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाला आहे. मात्र अधिकारी आणि ठेकेदारांच्या मिली भगत कार्यक्रमामुळे जल जीवन मिशन योजनेचा बट्ट्या बोळ करून ठेवला आहे. 2022 पासून संपूर्ण करमाळा तालुक्यातील एकही योजना अजून पूर्ण झालेली नाही. ठेकेदार एक आणि काम करणारे दुसरे असल्याने एवढ्या महत्वकांक्षी योजनेच्या कामाची ग्रामीण भागात वाताहात झाली आहे. वास्तविक अनेक एजन्सी कडे एका पेक्षा जास्त कामे असून काही गावात सरपंच आणि ठेकेदार यांचे कडून संगणमताने योजनेचे तीन तेरा वाजवण्याचे काम सुरू आहे. दोन वर्षात 25% सुद्धा काम पूर्ण झाले नसल्याचे दिसत आहे. अधिकारी वर्गाचे ही पूर्ण दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे. तर पुढारी निवडणुकीच्या धामधुमीत व्यस्त असल्याने शासनाने कोट्यावधीचा निधी खर्चून ही सर्वसामान्य माणसाला पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचे चित्र संपूर्ण करमाळा तालुक्यातील दिसत आहे. योजनेवर कोट्यावधी चा खर्च करूनही सर्वसामान्य नागरिकांना पाण्यासाठी काम धंदे सोडून विनाकारण वनवन भटकावे लागत आहे. नागरिकांना पाण्यासाठी पैसे खर्चून पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. प्रशासनाने एक तर पाण्याचे टँकर सुरू करावेत अन्यथा आपल्या कार्यालयासमोर प्रहार चे वतीने घागर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा प्रहार शेतकरी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष सोमनाथ जाधव यांनी दिला आहे.